केराटोकोनस – अशी स्थिती ज्यामध्ये डोळ्याच्या समोरील कॉर्निया बाहेरून फुगते

डॉ. श्रुती वारके
(नेत्रशल्यचिकित्सक, व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन)

एखाद्या औषधाच्या, खाद्य पदार्थांच्या सेवनामुळे अथवा ऋतुमानानुसार अॅलर्जी होतं असल्याचे अनेकदा आपण ऐकतो, अनुभवतो. अंगाला खाज सुटणे, पुरळ येणे ही त्याचीच काही लक्षणे होत. पण हीच अॅलर्जी जेव्हा डोळ्यांना होते तेव्हा त्यास केराटोकोनस असे म्हणतात. वैद्यकीय भाषेत सांगायचे झाल्यास डोळ्याच्या समोरील पडदा (कॉर्निया) म्हणजे डोळ्यातील स्पष्ट, घुमट आकाराचा पृष्ठभाग जेव्हा पातळ होतो आणि हळूहळू बाहेरून शंकूच्या आकारात फुगतो तेव्हा केराटोकोनस होतो. हा आजार सामान्यतः दोन्ही डोळ्यांवर परिणाम करत असला तरी अनेकदा एका डोळ्यावर याचा परिणाम जास्त होतो. साधारणपणे १० ते २५ वयोगटातील मुलांमध्ये प्रामुख्याने हा आजार आढळून येतो.
हा आजार जसजसा वाढत जातो तशी लक्षणे बदलू शकतात.

  • अंधुक दृष्टी.
  • प्रखर प्रकाशामुळे होणारा त्रास. यामुळे रात्री वाहन चालवताना समस्या उद्भवू शकते.
  • चष्म्याच्या नंबर वारंवार होणारा बदल.
  • दृष्टी दोष.

केराटोकोनसची होण्याची कारणे
केराटोकोनस कशामुळे होतो हे निश्चितपणे सांगता येत नाही. अनुवंशिकता किंवा ऋतुमानानुसार होणाऱ्या बदलांमुळे केराटोकोनस होण्याची शक्यता संभवते. केराटोकोनस असणा-या १०पैकी एका रुग्णास अनुवंशिकता आढळून येते.
यामुळेही होऊ शकतो केराटोकोनस:

  • अनुवंशिकता
  • डोळे जोरात चोळणे
  • रेटिनायटिस पिगमेंटोसा, डाउन सिंड्रोम, एहलर्स-डॅनलॉस सिंड्रोम,ताप आणि दमा आदी आजारांमुळे.

काही रुग्णांमध्ये डोळ्याचा समोरील पडदा लवकर फुगतो आणि अचानक दृष्टी कमी होऊ शकते. आणि पडद्यावर डाग येतात. यास्थितीत डोळ्याच्या समोरील पडद्यातील अस्तर तुटते. ज्यामुळे डोळ्यातील द्रव कॉर्नियामध्ये (हायड्रॉप्स) प्रवेश करू शकतो. यामुळे आलेली सूज सहसा आपोआप कमी होते, परंतु अनेक रुग्णांमध्ये एक डाग तयार होऊ शकतो ज्यामुळे त्यांच्या दृष्टीवर परिणाम होऊ शकतो.

याचे निदान कसे केले जाते?
प्रथमत: अनुभवी नेत्र चिकित्सकांकडून कॉर्नियाचा आकार मोजला जातो. याचे निदान करण्याचे अनेक मार्ग आहेत, परंतु सर्वात सामान्य म्हणजे कॉर्नियल टोपोग्राफी(CORNEAL TOPOGRAPHY )
केराटोकोनसचा उपचार रुग्णांच्या लक्षणांवर अवलंबून असतो. जेव्हा रुग्णाची लक्षणे सौम्य असतात, तेव्हा त्याची दृष्टी चष्म्याने दुरुस्त केली जाऊ शकते. नंतर दृष्टी योग्य फोकसमध्ये ठेवण्यासाठी विशेष हार्ड कॉन्टॅक्ट लेन्स घालण्याची आवश्यकता रुग्णांना भासू शकते. या व्यतिरिक्त काही पद्धतीतून यावर उपचार केले जातात, त्यापैकी
1)कोलेजन क्रॉस-लिंकिंग:
डोळ्यातील समोरील पडदा मजबूत करण्यासाठी नेत्रतज्ज्ञ विशेष अतिनील प्रकाश(UV Rays) आय ड्रॉप्स (RIBOFLAVIN eye drops) वापरण्याचा सल्ला देतात. असे केल्याने रुग्ण्याच्या कॉर्निया सपाट होण्यास किंवा कडक होण्यास मदत होते, ज्यामुळे तो फुगण्याची शक्यता कमी होते.
2) IntraCorneal Ring Segments ( ICRS rings ):
यामध्ये नेत्ररोगतज्ज्ञ शस्त्रक्रिया करून ICRS rings कॉर्नियामध्ये ठेवतात. ज्यामुळे रुग्णाची दृष्टी सुधारण्यास तसेच कॉर्नियाची वक्रता सपाट करण्यास मदत होते.

3) कॉर्नियल प्रत्यारोपण(CORNEAL TRANSPLANTATION):
जेव्हा रुग्णांमध्ये याची लक्षणे गंभीर असतात, तेव्हा डॉक्टरांकडून कॉर्नियल प्रत्यारोपणाचा सल्ला दिला जातो. यामध्ये कॉर्निया डोनरच्या टिश्यूने नेत्रचिकित्सक कॉर्नियाचा सर्व ( PENETRATING KERATOPLASTY) किंवा काही भाग (LAMELLAR KERATOPLASTY) शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बदलतात.
प्रतिबंध कसा करावा:

सामान्यतः केराटोकोनस रोखता येत नाही. परंतु, तो झाल्यावर मात्र त्याचे वेळीच निदान करून तो आटोक्यात ठेवता येतो.
१० वर्षांवरील कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी नियमित डोळ्यांची तपासणी करणे गरजेचे आहे(प्रामुख्याने केराटोकोनस ची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंब सदस्यांनी)
अॅलर्जीमुळे डोळे चोळणे टाळा.
डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर औषधे घेऊ नका.
डोळे न चोळता स्वच्छ ठेवा.
पोहताना किंवा मैदानी खेळ खेळताना डोळ्यांची विशेष काळजी घ्या.
डोळ्यांसंबंधित कोणतीही समस्या उद्भवल्यास तातडीने नेत्र तज्ञाचा सल्ला घ्या.

केराटोकोनसच्या यशस्वी उपचार करता येतात. परंतु, रुग्णांनी देखील डोळ्यांच्या आरोग्य बाबतीत सर्तक असणे आवश्यक असते. डोळ्याच्या निरोगी आरोग्यासाठी कॉर्नियाची जाडी स्थिर राहणे आणि दृष्य तीक्ष्णता कायम राहणे ही बाब अत्यंत महत्त्वाची असते. त्रास झाल्यावर रुग्णालयात धाव घेण्यापेक्षा त्रास होऊच नये म्हणून प्रत्येकाने नियमित डोळ्यांची तपासणी करून घ्यायला हवी.

 

डॉ. श्रुती वारके

नेत्रविकार तज्ञ व नेत्रशल्यचिकित्सक,
व्हिजन नेक्स्ट फाऊंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published.

This field is required.

You may use these <abbr title="HyperText Markup Language">html</abbr> tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>

*This field is required.